ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.०९, ठाणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ या विशेष मोहिमेमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्तालय’ गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली असून, सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

या यशाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांचा विशेष सत्कार व गौरव माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवाने ठाणे पोलीस दलाचे मनोबल अधिक वाढले असून, भविष्यातील सेवा अधिक सक्षमपणे देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. हा पुरस्कार ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमता, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतिक मानला जात आहे.