येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा येथील जय जवान नगर परिसरात काल शनिवार दिनांक ०७ रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. परिसरातील डोंगरावर मित्रांसोबत खेळत असताना ११ वर्षांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन तो डोंगरावरून खाली कोसळला. या गंभीर अपघातात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या डोंगर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सिमाभिंत उभारण्यात यावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत.

मात्र, प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांत याच डोंगर परिसरात चार दुर्दैवी घटना घडल्या असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
सध्या या डोंगराचा काही भाग कमकुवत झाला असून कुठल्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “आता आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग आणि नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाने तातडीने सिमाभिंत उभारावी, सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा, अशी जोरदार मागणी येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी धरली आहे. या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने पाहते का, याकडे संपूर्ण येरवडा वासीयांचे लक्ष लागले आहे.



