अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२४, अहिल्यानगर : जिल्ह्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांविरोधात लढताना वीरमरण आलं. ते सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला. 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे संदीप पांडुरंग गायकर मागील सहा ते सात वर्षांपासून सैन्यदलातील मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. गुरुवारी पहाटे, जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या दहा जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात देशासाठी लढताना संदीप गायकर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संदीप गायकर हे शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सैन्यात निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा बजावली. देशाच्या संरक्षणासाठी उभे असताना शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच गावात शोककळा पसरली. वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांचं पार्थिव अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावी २३ मे रोजी आणण्यात आले होते.

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

त्यांचे पार्थिव गावात पोहोचल्यानंतर प्रथम संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. संदीप गायकर यांनी शिक्षण घेतलेल्या सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अंत्यसंस्कारावेळी शहीद संदिप गायकर अमर रहे च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. सैन्यदल आणि अहिल्यानगर पोलिस दलाच्या वतीने शहीद जवानास लष्करी मानवंदना देण्यात आली. संदिप गायकर यांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!