देसाई खाडीत जलपर्णीचा वाढता विळखा; पूरस्थिती व पर्यावरणाला गंभीर धोका
अक्षराज : विनोद वास्कर
दि.१९, देसाई गांव (ठाणे) : देसाई खाडीत (पलवा – कासारिओ रोड, निळजे) मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. जलपर्णीच्या दाट थरामुळे खाडीतील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे व पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

पर्यावरण तज्ञांच्या मते जलपर्णीमुळे खाडीतील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून त्याचा थेट परिणाम मासे व इतर जलचरांच्या अस्तित्वावर होत आहे. तसेच पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया सारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. खाडीतील पाणी दूषित होऊन परिसरात दुर्गंधी पसरत असून पर्यावरणीय समतोलही बिघडत आहे.
नागरिकांची मागणी…
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घ्यावी. तसेच भविष्यात तिचा पुनर्प्रसार रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. वेळेत कारवाई झाल्यास पूराचा धोका कमी होण्यास, पर्यावरणाचे संरक्षण करण्यास आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होईल.



